अहिल्यानगर, दि.२६ – दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून इच्छुक अर्जदारांनी २६ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या धनाकर्षासह अर्ज रोखपाल विभाग खिडकी क्रमांक १४ येथे जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.
अर्ज सादर करताना वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक धनाकर्ष अहिल्यानगर कँप ब्रँच/ ट्रेझरी ब्रँच कोड क्र. १३२९६ करिता देय असावा.

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमाकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशा अर्जदारांनी २७ मार्च २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता पसंती क्रमांक शुल्काच्या धनाकर्षाव्यतिरिक्त जादा रक्कमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सिलबंद करून खिडकी क्रमांक १४ वर जमा करावेत. तसेच या धारकांनी २७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे.
लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह उपस्थित रहावे. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदाराला परत करण्यात येईल. विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. तसेच पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदाराला दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.