Ahmednagar Corona Update : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ! अहमदनरची आरोग्य यंत्रणा अलर्टवर, ‘या’ उपाययोजनांना सुरुवात

Published on -

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे केरळ पाठोपाठ राज्यात रुग्ण सापडले आहेत. मुंबई,पुणे परिसारत हे रुग्ण आहेत. त्यामुळे आता या कोरोनाच्या नवीन विषाणू बाबत आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, त्यानुसार तयारी ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणा तयारीला लागली आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपायोजना राबवण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

राज्यात पुन्हा कोविडचा संसर्ग वाढू नयेत, जनतेमध्ये घबराट निर्माण होवू नयेत, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सर्तक राहण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. राज्यात कोविडच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी देशात कोविडचे रुग्ण आढळलेले आहेत. राज्यात आढळून आलेल्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे, आरोग्यमंत्री सावंत यांनी आरोग्य खात्याची ऑनलाईन व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली.

या बैठकीला नगरहून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे कोविडच्या नवीन व्हेरियंटबाबत सर्तक राहण्यासोबत गरज भासल्यास तपासणी वाढवावी, जिल्हा स्तरावर शासकीय आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, संशीयत रुग्णांवर लक्ष ठेवावे, कोविड यंत्रणेचा आढावा घ्यावा यासह यापूर्वी कोविड संसर्गात राबवलेल्या उपाययोजना सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या. याबाबत राज्य आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र मार्गदर्शक सूचना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगरमध्ये रुग्ण नाहीत

अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोविडचे रुग्ण नाहीत. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बाली पडू नका. भिऊ नका काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe