नगर- कोरोनाच्या अभुतपूर्व संकटामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वच स्तरातील लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना वेतना अभावी हाल होत आहेत.
त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात प्रतिमहा ठराविक सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष डॉ. नवनाथ टकले, सेक्रेटरी प्रा. मछिन्द्र दिघे यांनी केली
असल्याची माहिती प्रा. सतीश शिर्के यांनी दिली. कोरोना मधे सर्वात जास्त विनाअनुदानित शिक्षक होरपळत असूनही दुर्लक्षित आहे. मागील १५-२० वर्ष संघर्ष करूनही अनेक सरकारे आली, गेली पण यांचे प्रश्न जैसे थे. शासन अनुदान देत नाही.
शाळा-महाविद्यालय चालू होती तेव्हा काही व्यवस्थापन त्यांना तुटपुंजे वेतन अदा करायची. फ़ी नाही तर वेतन कसे द्यायचे असा प्रश्न काही शाळा करत आहेत.
भविष्याकड़े डोळे लावून बसलेली ही शिक्षक मंडळी अध्यापनाचे पवित्र काम संभाळून अन्य वेळेत शिकवणी, शेती, पशुपालन, मजुरी मिळेल ते काम करून आपला कसाबसा उदरनिर्वाह चालवित होती.
मात्र कोरोनामुळे संचारबंदी, लॉकडाऊन झाल्याने शाळा-महाविद्यालय बंद झाली. कायम शिक्षकांप्रमाणे यांना हमखास वेतन नाही, आणि अन्य रोजगारही थांबले. शिल्लक असण्याचे कारण नाही.
अन्य घटकांकडे शासन, समाजसेवी संस्थाचे लक्ष आहे. त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र अशा विनाअनुदानित शिक्षकांकड़े सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
बर शिक्षक आहेत म्हटल्यावर त्यांना कसली असणार अडचण? अशी समाजभावना असल्याने ते दुर्लक्षित राहिले आहेत. कुठलाच आर्थिक स्तोत्र नसल्याने दैनंदिन गरजा भागविणे या शिक्षकांना अवघड बनले आहे.
या जीवन संघर्षात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान न देणे ही शासनाची चूक आहे. त्यामुळे यांची जबादारी शासनाने घ्यावी व सानुग्रह अनुदान राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यावर जमा करावी
यासाठी संघटनेचे मार्गदर्शक प्रा. भास्करराव जऱ्हाड, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. अश्रुबा फुंदे, प्रफुल्लचंद्र पवार, शरद देशमुख, सोपानराव कदम, राहुल गागरे, राजू रिक्कल, प्रमोद कुलकर्णी, ऋषि सर , अमिता कोहली, शितल जगताप आदी प्रयत्नशील आहेत.