बदलती जीवनशैली मधुमेहाला कारणीभूत -मिलिंद सरदार

Published on -

अहमदनगर :- बदलती जीवनशैली मधुमेह आजाराला कारणीभूत ठरत आहे. मधुमेह हा सायलंट किलर आजार असून, त्या आजाराने शरीरातील सर्व अवयव हळूहळू निकामी होतात. तर मधुमेहाबद्दल असणार्‍या अज्ञानाने हा आजार देशात मोठ्या गतीने वाढत असल्याची भावना नॅचेरोपॅथी तज्ञ मिलिंद सरदार यांनी व्यक्त केली.

प्रेमदान चौक येथील माधवबाग कार्डियाक केअर युनिटच्या वतीने मधुमेह निर्मुलनसाठी रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी सरदार बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या मधुमेह आजाराने भारत हा जगातील मधुमेह आजाराची राजधानी होणार आहे. मधुमेह जडल्याने निर्माण होणारे ह्रद्यरोग व इतर विविध आजाराने देशातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शास्त्रीयदृष्टा अभ्यास करुन, माधवबागने देशात निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद, व्यायाम व जीवनशैलीत बदल करुन मधुमेहावर कायमचा विजय मिळविण्यासाठी चळवळ उभी केली आहे. जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेह आजार पुर्णत: बरा होतो.

यामध्ये दोन प्रकारातील मधुमेह असून, सर्वात जास्त भारतात आढळणारा प्रकार दोनचा मधुमेह पुर्णत: बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये मधुमेह होण्याची कारणे व मधुमेहापासून सुटका मिळवण्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मधुमेह संबंधी तपासण्या माफक दरात करुन देण्यात आल्या. प्रास्ताविकात माधवबाग नगर युनिटच्या प्रमुख डॉ.स्वाती कुमठेकर यांनी नागरिकांना मधुमेह आजाराबद्दल असलेली सखोल माहिती देऊन त्यांना जागृत करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe