मंगळवारी २ तारखेला निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी तिव्र निषेध केला. गुरुवार (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानेस्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला.
येत्या दोन दिवसांत पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच सराईत गुन्हेगार धोंड्या जाधव याला तसेच त्याच्या गुन्हेगार साथीदारांवर मोक्का लावण्याची मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली.
तसेच मंगळवार (दि. ९) जुलै रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या घटनेतील आरोपींवर मोक्का लावण्याबाबत ठराव घेण्यात येणार आहे. पारनेर व नगर पोलीसांनी यामध्ये हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
निघोज आणि परिसरात मटका, जुगार, अवैध दारूविकी, आदी व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. पोलीस खात्याला या सर्व धंद्यांची माहिती असूनही ते डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
गावातील अवैध धंदे बंद न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करूनही हे धंदे बंद न झाल्यास पुन्हा एकदा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी या वेळी दिला.
धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुणे व नगर पोलीसांना आहे. मात्र, स्थानिक पोलीस अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात, राजरोसपणे हा गुन्हेगार निघोज, टाकळी हाजी, ता. शिरूर परिसरात दहशत निर्माण करून व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करतो.
त्याच उद्देशाने धोंड्या जाधव याने जत्रा हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण करून दहशत निर्माण केली. हल्लेखोरांकडे कोयते, तलवारी, दंडुके अशी हत्यारे होती याचा अर्थ हा हल्ला पूर्वनियोजित कट होता. या हल्ल्याचा निषेध करून ग्रामस्थांनी गावातून मूकमोर्चा काढला तसेच मळगंगा मंदिरासमोरील जाहीर निषेध सभेत पोलिसांना निवेदन दिले.
या वेळी माजी सरपंच ठकाराम लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील, रुपेश ढवण, माजी उपसभापती खंडू भुकन, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शशिकला भुकन, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उप कार्याध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, माजी चेअरमन रामदास वरखडे, शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद,
सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अंकुश लोखंडे, माजी उपाध्यक्ष वसंत ढवण, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी बाळासाहेब रसाळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ, महेश लोळगे, मयुर गुगळे, मळगंगा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनीताई पवार, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व उपकार्याध्यक्ष भास्करराव कवाद, निघोज शहराध्यक्ष आनंद भुकन व योगेश खाडे, प्रवक्ते जयसिंग हरेल, सागर आतकर, रवि रणसिंग आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनेतील दोन आरोपींना अटक
हॉटेल जत्राच्या मालकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी आदिनाथ मच्छिद्र पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), धोंड्या उर्फ धोंडीभाऊ महादु जाधव (रा. निघोज कुंड ता. पारनेर), सोन्या उर्फ प्रथमेश विजय सोनवणे (रा. निघोज ता. पारनेर) विशाल खंडु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), शंकर केरु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशाल पठारे, शंकर पठारे यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत.