शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण लवकरच

Mahesh Waghmare
Published:

३ जानेवारी २०२५ शिर्डी: शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे,अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली.

गुरुवारी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, माजी नगरसेवक ताराचंद कोते, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री मोहळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी विमानतळाच्या अडचणी सोडवण्याची विनंती केली होती.

त्यानुसार, विमानतळासाठी सीआयएसएफ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले आहेत. १५ दिवसांत नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना विमानसेवेने जोडण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.शिर्डी विमानतळाच्या थकीत साडेआठ कोटी रुपयांच्या कराबाबत विचारले असता, काकडी ग्रामपंचायतीला कर भरण्यासाठी प्रयत्न करू, असे मोहळ यांनी सांगितले.

देशात सध्या ६०० मार्ग उडाण योजनेत समाविष्ट असून, विमानतळांची संख्या ७५ वरून १५७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच विमानतळांवर स्वस्त दरात भोजन-नाश्ता उपलब्ध करून देण्याची योजना कोलकाता विमानतळापासून सुरू करण्यात आली आहे, ज्याचा विस्तार इतर विमानतळांवर होणार आहे.

येत्या ६ जानेवारीला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यमंत्री मोहळ यांच्या उपस्थितीत राज्यातील विमानतळांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.शिर्डी विमानतळावर नव्या सुविधांमुळे भाविकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe