Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार असल्याचा आनंद व अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा क्षण ऐतिहासिक असल्याने दोन्ही प्रसंग हे दिवाळी सणाप्रमाणे साजरे करावेत, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील चिचविहिरे, गणेगाव, वडनेर, कानडगाव, निर्भरे, तुळापूर, तांदुळनेर आदी ठिकाणी खा. डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत नुकतीच साखर वाटप करण्यात आली. तसेच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खा. डॉ. विखे म्हणाले की, राज्यात आता सामान्य शेतकऱ्यांना दूध अनुदान मिळावे, म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असून शेतकऱ्यांनी जनावरांचे टॅगिंग करून घ्यावे.
खाजगी दूध संकलन केंद्र व सहकारी दूध संस्था शेतकऱ्यांना अनुदान देत नाहीत. त्यामुळे आता हा चांगला पर्याय आहे. राहुरी तालुक्यातील या जिरायत भागाला निळवंडे धरण कालव्यातून पाणी मिळावे, यासाठी विखे पाटील परिवाराने कायम शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. त्यामुळे निळवंडे व अयोध्या येथील श्रीराम मंदिर हे दोन क्षण महत्वाचे असल्याने हे दोन्ही दिवस दिवाळी म्हणून साजरे करावेत. आपली सत्ता आल्यानंतर या परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत.
माजी आ. कर्डिले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ता असताना विकासकामे करता आले नाहीत. फक्त विरोधी माणसाला त्रास देण्याचे काम झाले. त्यातून काहींना पक्षात येण्यासाठी हतबल केले.
आमच्या साखर वाटपाला हत्तीवरून साखर वाटा, अशी टीका करता मग आपणही कारखानदार आहात, आपणही असा उपक्रम राबवा, पण सामान्य माणसाच्या भावना यांना कधी समजत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, चांगदेव भोंगळ, माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे, सर्जेराव घाडगे, सरपंच शोभाताई भनगडे, सोपान गागरे, विकास कोबरणे, मारुती नालकर, संदीप गिते, भिमराज हारदे, आण्णासाहेब बलमे, बापूसाहेब मुसमाडे, शांताराम सिनारे, संदीप घाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील गणेगाव या छोट्या गावासाठी खा. डॉ. विखे व माजी आ. कर्डिले यांनी भरभरून निधी दिला. मात्र गावातील एका घटनेच्या अनुषंगाने सत्तेच्या माध्यमातून हतबल केल्याने मला त्यावेळी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावा लागला होता.
परंतु त्यांच्या आताच्या टिकेला अर्थ नाही, कारण त्यांनी गावासाठी एक रुपया निधी दिला नाही. श्रेय घेण्यासाठी आमच्यावर टीका केली जाते, असा खुलासा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांनी यावेळी केला.