Ahmednagar News : उत्तरेसाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून काल (२२ जानेवारी) पाणी सोडण्यात आले. हजारो हेक्टर शेतीस वरदान ठरणाऱ्या या कालव्यास पाणी कधी सुटणार याकडे सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. उजवा कालवा पूर्ण करण्यात आल्यानंतर कालव्यातून पहिले चाचणी आवर्तन सोडले गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,

खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभवराव पिचड व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिचडांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न?
निळवंडे कालव्याचे पाणी सोडले व याचे पूजन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. एकंदरीतच पिचडांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न मंत्री विखे यांनी केला असे बोलले जात आहे. याचे कारण असे की,
निळवंडे धरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान पिचड यांचे राहिले आहे. परंतु यापूर्वी पार पाडलेल्या विविध कार्यक्रमात पिचड दुर्लक्षित राहिल्याचे दिसले. पिचड पिता-पुत्राची यामुळे नाराजगी झाली असे बोलले गेले.
आता हे पूजन त्यांच्या हस्ते करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला असे म्हटले जात आहे.
हजारो हेक्टर शेतीला फायदा
सोमवारी सोडलेल्या या चाचणी आवर्तनातून लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्त जिरायतदार गावांतील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा पूर्ण झाली. हजारो हेक्टर शेतीला या पाण्याचा फायदा होणार आहे.
हजारो हेक्टर शेती, जिरायत भाग पाण्याखाली येईल व हा भाग सुजलाम सुफलाम बनेल यात शंका नाही.













