अहिल्यानगर : एक दिवस शिवरायांच्या गड, किल्ले आणि दुर्गांसाठी या खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहीमेअंतर्गत या महिन्यात १३ एप्रिल रोजी श्रीगोंदे तालुक्यातील पेडगांव येथील धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहभागी होणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची सेवा आहे. याच ध्यासातून शुक्रवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर गडावर स्वच्छता व सवंर्धन मोहीमेस प्रारंभ करण्यात येणार आहे.

या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, सुचक मंडळं, विद्यार्थी, महिला मंडळं, आणि सर्वसामान्य नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद अपेक्षीत आहे. या मोहिमेसाठी अहिल्यानगर शहर आणि पारनेर येथून जाण्या-येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्वयंसेवकांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे खा. नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या मोहीमेचा उद्देश गड-किल्ल्यांवरील अनावष्यक कचरा हटवून परिसर स्वच्छ करणे, पर्यावरण रक्षणाला चालना देणे तसेच भविष्यातील पिढयांसाठी हा ऐतिहासिक वारसा जतन करणे आहे. मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांना कामासाठी आवष्यक असलेले झाडू, कचरा गोळा करण्याच्या पिशव्या, ब्रश, वायब्रेण्ट बॅग्ज इत्यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिवनेरीवरून शुभारंभ
खा. नीलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० मार्च रोजी या मोहिमेची घोषणा करून त्यानंतर १६ मार्च रोजी या मोहीमेचा शिवजन्मभुमी शिवनेरी येथून शुभारंभ करण्यात आला होता. पहिल्याच मोहीमेमध्ये शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते.