Ahmednagar Politics : नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.
आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील सर्व पक्ष आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकानंतर लगेचच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अशातच आता अहमदनगरच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे.
तो म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या धर्म पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीमध्ये आता शीतयुद्ध सुरू होणार असे चित्र तयार होत आहे. खरंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ख्याती आहे. राजकारणात देखील अहमदनगर जिल्ह्याचे स्थान हे कोणापासूनच लपून राहिलेले नाही. यामुळे सर्व पक्ष अहमदनगर जिल्ह्यातील दोन लोकसभेच्या मतदारसंघांकडे लक्ष ठेवून आहेत.
जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. उत्तरेत एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत तर दक्षिणेकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. मात्र भाजपच्या या गडाला आता निलेश लंके यांच्या धर्मपत्नीने सुरंग लावण्याचा निर्धार केला आहे. खरे तर नगर दक्षिण साठी सुजय विखे पाटलांनी आतापासूनच तयारी सुरू केले आहेत. ते आपल्या मतदारसंघात मोफत साखर आणि डाळ वितरणाचा कार्यक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या मतदारसंघातून चांगला रिस्पॉन्स देखील मिळत आहे. लोकांच्या माध्यमातून मोफत साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. मात्र त्यांच्या लोकसभेच्या जागेवर राणी लंके यांनी दावा ठोकला आहे. राणी लंके यांनी नगदक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे.
लोकसभेला समोर कोणीही उमेदवार असला तरी देखील त्याचे आम्हाला काहीही देणे घेणे नसून जनतेच्या विकासासाठी आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मन की बात राणी लंके यांनी केली आहे. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांनी देखील बंड पुकारला आहे. आमदार राम शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिणेमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राम शिंदे आमदार निलेश लंके यांच्या बरोबर पाहिले गेले होते.
यामुळे सुजय विखे पाटलांची आता डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. खरे तर राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व होते. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सहा आमदार राष्ट्रवादीकडे होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि चार आमदार अजितदादांकडे गेलेत. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट सध्या अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी तयारी करत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा असला तरी देखील विखे पाटलांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा पगडा आहे, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांच्या माध्यमातून विखे पाटलांच्या विरोधात ताकतवर नेत्याला उभे करण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मध्यंतरी आमदार निलेश लंके स्वतः विखे पाटलान विरोधात उभे राहतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चा राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापूर्वी पाहायला मिळत होत्या.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर निलेश लंके अजितदादा गटात आले आणि ते आता सत्तेत आहेत. यामुळे आमदार महोदय यांचे नाव मागे पडले आहे. शिवाय भाजप कडून सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचे पाहायला मिळत आहे. पण अशातच आता राणी लंके यांनी या लोकसभा मतदारसंघावर आपला दावा जाहीर केला आहे.
राणी लंके यांनी आपल्या मनातील इच्छा ओठांवर आणली असल्याने आता नगरच्या राजकारणात एकंदरीत मोठा ट्विस्ट येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एकंदरीत महायुतीमध्ये असणाऱ्या अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नीने सुजय विखे पाटला विरोधातच जाण्याचा पवित्रा घेतला असल्याने नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.