Ahmednagar News : महिला सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील महिला सरपंच सौ. प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध १२ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.

अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या उपस्थितीत दि. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत १२ पैकी १२ सदस्य गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले.

सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि.९ रोजी दुपारी सरपंच सौ. प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता.

अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दि. १४ रोजी ११ वाजता राजापूर ग्रामपंचायत येथे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कलम ३५ (२) नुसार राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते.

मात्र, दोन्ही गटांच्या सदस्यांमध्ये सरपंच पदासाठी बेबनाव झाल्याने दोन्ही गटाच्या सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीकडे पाठ फिरविली. दुपारी तीन वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच सौ. प्रतीक्षा धनंजय मेंगवडे वगळता एकही सदस्य न फिरकल्याने अप्पर तहसीलदारांनी अविश्वास ठराव नामंजूर केला.

अविश्वास ठराव नामंजूर झाल्याने सरपंच सौ. प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून उत्सव साजरा केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe