भिंगार छावणी परिषदेतील प्रश्‍नांचे ना. शरद पवारांना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- भिंगार छावणी परिषदेतील विविध नागरी प्रश्‍न सुटण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून सदरील प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. शरद पवार यांना दिले.

अहमदनगर शहराच्या दौर्‍यावर पवार आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी संपत बेरड, अभिजीत सपकाळ, मच्छिंद्र बेरड, शुभम भंडारी, सुदाम गांधले आदी उपस्थित होते. भिंगारला एमआयडीसी मार्फत एमईएसला व एमईएस मार्फत छावणी परिषदेला पाणी मिळते.

त्यानंतर बोर्डामार्फत नागरिकांना पाणी दिले जाते. सदर पाणीपुरवठा औद्योगिक दराने केला जात असून, त्याचे दर चार ते पाच पट अधिक आहे. भिंगारकरांना घरगुती पाणीपुरवठा दराने पाणी मिळण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित करुन, शहराच्या फेज टू मधून किंवा चाळीस गावच्या बुर्‍हाणनगर योजनेतून पाणी मिळावे,

छावणी परिषदेला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा द्यावा, रक्षा मंत्रालय येथून सर्विस चार्ज (फंड) निधी थकीत असल्याने निधी उपलब्ध झाला नसल्याने छावणी परिषदचे कर्मचार्‍यांचे मागील महिन्यांचे वेतन झालेले नाही.

निधी नसल्यामुळे स्थानिक प्रश्‍न सुटू शकत नसून, छावणी परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, भिंगार शहरातील नागरिक घरापासून वंचित आहे या नागरिकांना भिंगार विभागात चटई क्षेत्राचे बंधन असल्याने दुसरा मजला बांधता येत नाही. वाढती लोकसंख्या व कुटुंबाचा विचार लक्षात घेऊन एफएसआय वन प्लस थ्री मिळण्यासाठी परवानगी मिळावी, केंद्र सरकारच्या सर्व योजना छावणी परिषदेस लागू करण्यात याव्या, मोकळ्या जागेवर हडको गृहनिर्माण योजना राबवावी,

शहराची परिस्थिती लक्षात घेऊन भुयारी गटार योजना कार्यान्वीत करावी, भुईकोट किल्ला हा लष्करी हद्दीत असून पर्यटनाच्या दृष्टीने तेथील काम सध्या बंद आहे. किल्ल्याचे सुशोभीकरण होवून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, शहरातून व्ही.आर.डी.ई. चे स्थलांतर होऊ देऊ नये, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे मध्यभागी असून फार अडचणीत आहे.

त्याचे मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे व पोलिसांच्या संख्याबळात वाढ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून, हे प्रश्‍न सोडवण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून सदरील प्रश्‍न सोडविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment