क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार लगाम पन्नास टक्क्यांपेक्षा शुल्क होणार कमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित व्हावी, खेळाच्या कौशल्यपूर्ण सरावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तयार होण्यासाठी तालुका ते विभागीय क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली.

खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून विविध खेळ संघटना तसेच क्रीडा मंडळांना सशुल्क शासन निर्णयाधिन राहून मैदाने वापरासाठी देण्यात आली. पण अनेक क्रीडा संकुलात खेळाडू हितापेक्षा व्यावसायिकतेला महत्व दिले जात असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत असल्याचे क्रीडा आयुक्त यांचे लक्षात आणू दिले

असता सर्व जिल्ह्यातील क्रीडा संकुलात शुल्क निर्धारण निश्‍चित करून खेळाडूंना न्याय देण्याबाबतच्या अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर यांच्या मागणीचा तातडीने विचार करून सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणा बाबत आदेशित केले जाऊन

वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल, तसेच मुलींना नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याचे आश्‍वासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी दिले.

क्रीडा आयुक्त यांचे सोबत बालेवाडी पुणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकार्‍यां सोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी क्रीडा आयुक्त बकोरिया बोलत होते. मैदाने/कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणी संदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड-एमपीएड-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती देणे बाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले.

खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परीषदेवर 50 टक्के शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावे या मागण्या महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मांडल्या. आठवी पर्यंतच्या खेळाडूंना मैदानावरील प्रवेशशुल्क व फी माफी अमंलबजावणी बाबत सहसचिव विलास घोगरे यांनी बाजू मांडली तर क्रीडा स्पर्धा विषयी महामंडळाचे निवृत्ती काळभोर व फिरोज शेख यांनी काही सुधारणा सूचविल्या.

खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्यासंदर्भात दिरंगाई होत असून लवकरात लवकर मैदाने खुली करावीत या बाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. बैठकीत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही करण्या बाबतचे निर्देश क्रीडा आयुक्तांनी दिले. बैठकीस उपस्थित सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक अनिल चोरमले, सहाय्यक संचालक सुहास पाटील, विजय संतान,

अरूण पाटील यांनी शासन योजना व नियमावली या बाबत माहिती दिली. या बैठकीस दत्तात्रय हेगडकर, महादेव फाफाळ, बाबूराव दोडके, शेखर कुदळे आदी उपस्थित होते. फीट इंडिया अंतर्गत शाळांच्या नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून, सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment