२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : बऱ्याच वर्षांपूर्वी शाळेत मराठीच्या पुस्तकात स्मशानातील सोनं असा एक पाठ होता. या कथेतील नायक त्याच्या हाताला काम नसल्याने रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन तेथील प्रेत उकरून त्यांच्या अंगावरील सोने काढून घेत व त्यातून आपली उपजीविका करत.मात्र आजच्या काळात देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. फरक फक्त इतकाच आहे तो सोने चोरीत असे मात्र आताचे चोरटे लोखंड चोरत आहेत.
त्यामुळे स्मशानातील सोनं नव्हे तर लोखंड असे म्हणल्यास वावगे ठरू नये.जिल्ह्यात रोज चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.मात्र मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी आपला चोरीचा फंडाच बदलला आहे. किमती वस्तूसह शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, शेतीची साहित्य आदी वस्तू चोरीला जात असताना आता तर चोरट्यांनी चक्क शवदाहिनीच्या लोखंडी जाळ्या चोरून हद्दच केली आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील सर्वात सधन ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या निंबळक येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत असलेल्या शवदाहिनीच्या लोखंडी जाळ्याच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.ही घटना दि.२२फेब्रूवारी रोजी घडली आहे.
याप्रकरणी श्रीकांत भाऊसाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान चोरट्यांनी थेट स्मशानभुमीत असलेल्या शवदाहिनीच्या जाळ्या चोरल्याने या भागातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
यापूर्वी या भागात रात्री अपरात्री चोऱ्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.यातील अनेक घटनांचा अद्याप तपास लागलेला नसून आता तर थेट स्मशानभुमी देखील चोरट्यांच्या रडारवर आली आहे.मात्र चोरट्यांचा या चोरीच्या घटनेमुळे या भागातील नागरिक चांगलेच संतापले असून पोलिसांनी या भागात गस्त घालावी तसेच या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.