मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आता नविन पोर्टल लाँच करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून अर्ज स्विकृती बंद करण्यात आली असून राखीपौर्णिमेला निधी वितरीत करण्यासाठी अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून यंत्रणा सुरू केली. परंतू योजनेची घोषणा झाल्यापासून रोज कोणता न कोणता बदल कानी पडत आहे.
प्रारंभी तहसीलदार यांचा उत्पन्न व रहिवासी दाखला अट रद्द केल्यानंतर घरात असलेल्या शिधापत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, बँक तपशिल देत योजनेत नोंदणी सुरू झाली. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून मुख्यमंत्री महिला सशक्त अभियानांतर्गत नारीशक्ती ॲप लाँच करण्यात आले होते. सदरच्या ॲपच्या माध्यमातून दैनंदिन हजारो महिलांनी शासनाकडे अर्ज दाखल करण्यास प्रारंभ केला.
ॲप चालविण्याबाबतही अनेक तक्रारी होत्या. ओटीपी तसेच अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करीत राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतणीस, सेतू कार्यालयामार्फत विनामुल्य अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणे सुरू असताना दोन दिवसांपासून अर्ज स्विकृती बंद असल्याचे समजले आहे.
याबाबत राहुरीचे तहसीदार नामदेव पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राहुरी तालुक्यात एकूण ५५ हजार ९५५ अर्जाची स्विकृती झाली आहे. त्यापैकी १४ हजार ८२० अर्ज मंजूर करण्यात आले. तर २ हजार ९६६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याच्या पुर्ततेसाठी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना पुन्हा अर्ज जमा केलेल्या व्यक्तीच्या ॲपवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची नवीन वेब पोर्टल लिंक देण्यात आली आहे. जुन्या ॲपवर केवळ दुरूस्ती केली जाणार आहे. नविन वेब पोर्टलचा वापर करीत अर्ज भरणा करताना आधार वरील माहिती अद्यावत असणे गरजेचे आहे. केवळ आधार नंबर टाकताच सर्व माहिती अपडेट होणार आहे.
केवळ बँकेची माहिती, कागदपत्र व फोटो अपलोड करीत अर्ज जमा करावे लागणार आहे. अर्ज सुलभता करण्यासाठी शासनाकडून पोर्टल लिंक देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारपासून नविन नाव नोंदणी बंद करण्यात आलेली आहे.
अर्जाची संख्या अधिक असल्याने पडताळणीसाठी नविन नाव नोंदणी बंद ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून समजली आहे. महिलांनी यापुढील काळात नविन वेब पोर्टलचा वापर करूनच अर्ज जमा करणे गरजेचे ठरणार आहे.
योजनेसाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, महसूलचा उत्पन्न दाखला, बँक तपशिल आदी कागदपत्र महत्वाची आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जुन्या पोर्टलवर अर्ज भरू नये
राहुरी राज्य शासनाने अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून पोर्टलऐवजी वेब लिंक जाहिर करीत केवळ आधार नंबर टाकून अर्ज भरण्याची सुविधा सुरू केली आहे. अधिक माहिती न भरता बँक तपशिल, कागदपत्र व फोटो अपडेट करीत अर्ज भरले जाणार आहे. पूर्वीच्या अॅपद्वारे त्रुट्या असलेल्या प्रकरणांबाबत त्रुट्या पूर्ण करीत दुबार अर्ज जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती राहुरी पंचायत समिती विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
तो घोळ नाहीच
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज मराठी किंवा इंग्रजी मध्ये भरला तरी ग्राह्य धरला जाणार आहे. इंग्रजीत अर्ज असेल तरच तो ग्राह्य ही अफवा आहे. तसा कोणताही प्रकार नसून दोन्ही भाषांमध्ये भरलेले अर्ज स्विकृत केले जात आहे. १ रुपया बँक खात्यात जमा करीत चाचपणी करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर अर्ज पडताळणी सुरू आहे.