पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार : सुनील गंगुले

Ahmednagarlive24 office
Published:
kopargav talav

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

शहरातील नागरीक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची झळ सोसत होते. महिला भगिनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. कधी १० ते १५ दिवस व उन्हाळ्यात तर २१ दिवसांनी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा होत होता.

यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी २०१९ च्या निवडणूकीत कोपरगावकरांना पाण्याबाबत दाखविलेले स्वप्न, होऊ घातलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या निमित्ताने सत्यात उतरत आहे. त्यामुळे कोपरगावकरांची पाण्यासाठीची होणारी ससेहोलपट कायमची थांबणार आहे.

या साठवण तलावाला विरोधकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध करण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला, तरी हे सर्व प्रयत्न आ. काळे यांच्या निर्धारापुढे टिकाव धरू शकले नाही. आ. काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिल्यामुळे या निधीतून भव्य साठवण तलाव उभारला आहे. पाण्याचे जलकुंभ देखील उभे राहिले असून वितरण व्यवस्थेचे काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

साठवण तलावाच्या चोहोबाजूंनी भक्कम आर.सी.सी. भिंत असल्यामुळे पाणी चोरी देखील होणार नाही. साठवण तलावाचे काम सुरु झाल्यापासून कोपरगाव शहरातील बहुतांश नागरिकांनी विशेषतः महिला भगिनींनी स्वतः जाऊन ५ नंबर साठवण तलावाचे सुरु असलेले काम पाहिले आहे.

त्यामुळे संपूर्ण कोपरगावकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असलेला दिवस आ. काळे यांच्या प्रयत्नातून लवकरच उगवणार असून कोपरगावकरांची तहान भागविणारा ५ नंबर साठवण तलाव कोपरगावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe