Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल मंगळवारी (दि. ९) बंगळुरू येथील
दानशूर साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांच्या शिरपेचात आतापर्यंत सोने, रत्नजडित हिऱ्यांचे १८ मुकुट अर्पण केले आहेत.
जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार वेगाने होत आहे. देशविदेशात साईबाबांची हजारांहून अधिक मंदिरे असून करोडो भक्त आहेत. साईबाबांच्या दानपेटीत देशविदेशातील भाविकांकडून वर्षभरात ४०० कोटींहून अधिक दान साईंबाबा संस्थानच्या दानपेटीत जमा होत आहे.
साईबाबांच्या डोक्यावरील सुवर्णमुकुटांच्या संख्येत वाढ होत असून सोने, चांदी, रत्नजडित हिऱ्यांचे अंदाजे १८ मुकुट भाविकांकडून साईचरणी दान करण्यात आले आहेत. काल मंगळवारी (दि. ९) बंगळुरू येथील दानशूर साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी आपल्या परिवारासह साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी ५०४. ६०० ग्रॅम वजनाचा २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला. सन २०२४ या वर्षातील अर्पण करण्यात आलेला हा पहिलाच सुवर्ण मुकुट आहे. यापूर्वी मागील वर्षी जुलै महिन्यात आंध्रप्रदेश येथील साईभक्त श्री विटला यांनी १९ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी दान केला आहे.
त्यानंतर सात महिन्यांच्या कालखंडानंतर हा मुकुट साईचरणी अर्पण केला आहे. साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईंबाबा संस्थानचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांच्यासह अधिकारी व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.