अहिल्यानगर: नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि नियमांनुसार चालावा, यासाठी तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा.
प्रलंबित प्रकरणं लवकर मंजूर करा आणि या विभागातल्या गोंधळावर आयुक्तांनी आता कठोर पावलं उचलावीत, असं आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना बजावलं.

हा विषय तसा नवीन नाही. नगररचना विभागाबद्दलच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जगताप यांनी २० मार्चला विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यानंतर बुधवारी त्यांनी शहरातल्या शासकीय विश्रामगृहात आयुक्त डांगे आणि नगररचना विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठकच घेतली. या बैठकीला क्रेडाई संघटना, इंजिनिअर आर्किटेक असोसिएशन आणि बांधकाम क्षेत्रातले व्यावसायिकही हजर होते.
जगताप म्हणाले, “आयुक्त हे महापालिकेचे पालक आहेत. मग नगररचना विभागाचा आणि एकूणच मनपाचा कारभार सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यांनी आपले अधिकार वापरून तातडीने काहीतरी करावं.
आम्हाला शासनाकडे तक्रार करायची वेळ येऊ देऊ नका.” त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं मांडलं.
या सगळ्याला उत्तर देताना आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, “नगररचना विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार आहोत. विभागात मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
नवीन आणि प्रलंबित प्रकरणं लवकर मंजूर करू. या बैठकीत ज्या तक्रारी आणि मागण्या समोर आल्या, त्यावर पुढच्या १० दिवसांत तोडगा काढू.” असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिलं.