बापरे! अहिल्यानगरमध्ये रक्तदाब वाढवणाऱ्या औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक

रक्तदाब वाढवणारे मेफेनटरमाइन औषध नशेसाठी वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी मोठ्या तस्कर रॅकेटच्या तपासाला सुरुवात केली असून चौकशी सुरू आहे.

Published on -

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट या औषधाची तस्करी आणि नशेसाठी वापर होत असल्याचा गंभीर प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. माळीवाडा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून या औषधाच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे शहरात औषधांच्या अवैध व्यापाराचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी छापा टाकून ७ बाटल्या केल्या जप्त

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहरुख अस्लम मनियार (वय २८) आणि सैजल अस्लम मनियार (वय २८, दोघेही रा. पृथ्वीराज लॉजच्या मागे, माळीवाडा) अशी आहेत. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मेफेनटरमाइन सल्फेटचा नशेसाठी गैरवापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी माळीवाडा परिसरात तपास सुरू केला. तपासादरम्यान, या परिसरात मेफेनटरमाइनच्या बाटल्यांची डॉक्टरांच्या परवानगीशिवाय विक्री होत असल्याचे उघड झाले. गुरुवारी पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकला, तेव्हा त्यांच्याकडून ३० एमएलच्या मेफेनटरमाइन सल्फेटच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या.

औषधाचा नशेसाठी गैरवापर

मेफेनटरमाइन सल्फेट हे औषध प्रामुख्याने कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना रक्तदाब वाढवण्यासाठी इंजेक्शनच्या स्वरूपात दिले जाते. मात्र, या औषधाचा नशेसाठी गैरवापर होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बेकायदा साठवून त्याची दुप्पट किमतीला विक्री करत होते. विशेष म्हणजे, हे औषध ते कुठून आणत होते आणि त्यांचे इतर कोणाशी संबंध होते, याचा पोलिस सध्या सखोल तपास करत आहेत. पोलिसांना संशय आहे की, शहरातील इतर भागांतही अशा प्रकारे औषधांची चोरटी विक्री होत असावी.

औषधाचे सेवन करणारे गंभीर गुन्ह्याशी संबधित

या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे, मेफेनटरमाइन सल्फेटचा वापर करणारे अनेकजण गंभीर गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून, अत्याचार, मारहाण यांसारख्या गुन्ह्यांतील काही आरोपींनी मेफेनटरमाइन सल्फेटसह गांजा आणि दारूच्या नशेचा वापर केल्याचे पोलिसांना आढळले. यामुळे शहरातील गुन्हेगारी आणि नशेच्या समस्येचा परस्परसंबंध अधोरेखित होत आहे. पोलिसांनी शहरातील इतर ठिकाणीही अशा औषधांच्या चोरट्या विक्रीचा संशय व्यक्त केला असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, मेफेनटरमाइन सल्फेट हे औषध रक्तदाब वाढवण्यासाठी अत्यंत नियंत्रित पद्धतीने वापरले जाते. जर अशा औषधांचा नशेसाठी गैरवापर होत असेल, तर हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. अशा गैरवापरामुळे केवळ आरोग्यालाच नव्हे, तर सामाजिक सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News