थरारक! बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले, मानेचा व पोटाचा भाग फाडला – राहुरी तालुक्यात भीतीचे वातावरण!

Updated on -

राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात सोमवारी पहाटे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत बिबट्याने शेतकऱ्याचे शीर धडापासून वेगळे करीत मानेचा व पोटाचा मोठा भाग फाडून खाल्ला. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे (वय ५५) असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सोमवारी पहाटे ४ वाजता गव्हाणे आपल्या मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. पाण्याचे बारे मोडण्यासाठी खाली वाकताच झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या पाठीमागून झडप घातली. गव्हाणे यांनी मोठ्या धैर्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्याने आरडाओरडही केली. मात्र, तेथे मदतीसाठी कोणीही उपस्थित नसल्याने बिबट्याने त्यांना जखमी केले.

बिबट्याने गव्हाणे यांना अनेक ठिकाणी चावा घेतल्या नंतर बिबट्याने त्यांच्या मानेचा भाग आणि पोटाचा मोठा भाग फाडून खाल्ला, त्यामुळे पोटातील आतडेही बाहेर आले होते. गव्हाणे सकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय टेंगे, वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विभागीय वन अधिकारी एस. बी. कंद यांनीही घटनास्थळी पाहणी केली. नंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मयत शोभाचंद गव्हाणे यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर आणि पंचक्रोशी परिसरात बिबट्यांचा मोठा वावर आहे. अनेक वेळा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना बिबट्याचे थेट दर्शन झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे या भागात पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ही घटना समजल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन वन विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्याने वाढत असून वन विभाग यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी डिग्रस गावात बिबट्याने एका लहान मुलीवर हल्ला करून तिला ठार मारले होते. आता पुन्हा शेतकऱ्याचा बळी गेला आहे. विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडूनही यावर कोणतीही ठोस कृती झालेली नाही, असा गंभीर आरोप तनपुरे यांनी केला.

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत, ‘‘जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत आणि ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’’ असा इशारा दिला आहे. त्यांनी अधिक आक्रमक भाषेत, ‘‘बिबट्याच्या भीतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर तो मंत्र्यांच्या बंगल्यात सोडायला हवा,’’ असे वक्तव्य केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe