अहिल्यानगरमधील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत नित्याचीच झाली आहे. बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले, माणसांवरील हल्ले हे देखील नित्याचेच झाले आहे. आता एकाच गावात तब्बल तीन बिबटे जेरबंद करण्यात यश आलं आहे.
राहुरी तालुक्यात तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे, राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणी मळा येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात सरासपणे बिबटे दिसून येत आहे वडनेर येथे एका शेतकऱ्याला बिबट्याने ठार केले. या घटनेनंतर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक पावित्रा घेत तालुक्यातील बिबट्याची वाढती संख्या लक्षात घेता पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली त्यानुसार ज्या भागात बिबटे सतत दिसून येत आहे त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावले आहेत.
राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे रामेश्वर आघाव यांच्या शेतात लावलेल्या एका पिंजऱ्यात चक्क दोन बिबटे अडकले आहे. सदर बिबट हे नर व मादी असण्याची शक्यता आहे.
यानंतर राहुरी फॅक्टरी नजीक असलेल्या वाणी मळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी वाणी यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला आहे.घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
वनविभागास एकच वाहन असून सदर वाहन हे चिंचाळे येथील जेरबंद दोन बिबटयास ताब्यात घेण्यासाठी गेले असल्याने वाणी मळा येथील बिबट्या डीग्रस येथील नर्सरीत नेण्यासाठी अडचण निर्माण झाली असता माजी नगराध्यक्ष कदम यांनी स्वतःच्या कॅम्पर वाहनात जेरबंद बिबट्या हा वाहन चालवत नर्सरीत पोहोच केला आहे.
सदरची कारवाई वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक समाधान चव्हाण, मदन गाडेकर, ताराचंद गायकवाड,कोहोकडे, सिनारे पथकाने केली आहे.











