अहिल्यानगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील निंबळक येथील ओंकार राजेंद्र खुंटाळे याने यश मिळविले. एकूण ११३२ पदांसाठी ही प्रक्रिया पार पडली. ओंकारने ६७३ वा क्रमांक मिळवत या परीक्षेत यश संपादन केले.
ओंकार खुंटाळेने प्राथमिक शिक्षण निंबळक येथील माध्यमिक विद्यालयात, उच्च माध्यमिक व पदवीचे स्व. मारुतराव घुले पाटील कॉलेज येथून पूर्ण केले. देहरे सहकारी सेवा सोसायटीचे सचिव राजेंद्र खुंटाळे आणि अंगणवाडी सेविका मीनाक्षी खुंटाळे यांनी पोटाला चिमटा घेऊन ओंकारच्या शिक्षणासाठी रसद पुरवली.

ओंकार खुंटाळेच्या यशाबद्दल निंबळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भानुदास कोतकर, डॉ. दिलीप पवार यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले.
आत्मनिर्धार फाउंडेशन कडून स्वागत मिरवणूक आणि सत्काराचे आयोजन
ओंकारच्या या यशाने निंबळक गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर यांनी दिली. आत्मनिर्धार फाउंडेशनने बुधवारी सायंकाळी ५.३० वा. स्वागत मिरवणूक आणि नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले आहे.