Ahmednagar News : वटपौर्णिमेच्या सणाला महिला वडाची पूजा करतात. या वेळी अनेक महिला दागिने परिधान करतात. नेमका या संधीचा भामटे फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी दुकानात थंडपेय खरेदीच्या बहाणे करून अज्ञात चोरट्याने महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नुकतीच ही धक्कादायक घटना घडली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती रविंद्र चिंचोले (वय ४०) यांचे कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गात ब्राम्हणगावकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ जगदंबा किराणा स्टोअर्स या नावाचे दुकान असून, सदर दुकानात वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी दोन इसम हे त्यांच्या जगदंबा किराणा स्टोअर्स जवळ विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन आले होते.
त्यापैकी एक इसम हा त्यांच्या दुकानामध्ये थंडपेय खरेदीच्या बहाण्याने आला होता. तेव्हा ज्योती चिंचोले या दुकानाबाहेर आल्या असता, सदर दुकानाचे काऊंटर जवळच उभा असलेल्या चोरट्याने जबदस्तीने त्यांचा हाताने गळा धरला व त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.
त्यानंतर तो त्याच्या साथीदारसह कोपरगावच्या दिशेने मोटरसायकलवरुन फरार झाला. याबाबत ज्योती चिंचोले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी इसमांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावरून दोन अनोळखी इसमांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, या घटनेने शहरातील सोने ओरबडून पळण्याचे लोन ग्रामीण भागातही पसरल्याने महिला वर्गात मोठी खळबळ पसरली असून भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच असाच
प्रकार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
दरम्यान, कोपरगाव शहरातील येवला रोड येथील श्रीराम पार्क येथील २९ वर्षीय अंकिता किरण सांगळे या (दि. २०) जून रोजी दीड वाजेच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना हॉटेल शीतल समोर पाठीमागून पल्सरवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गठन जबरदस्तीने हिसकावून नेले आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे.