अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केले असून बुधवारपासून (दि.16) हे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यासाठी दीड लाख कोर्बेव्हॅक्स लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.
चार दिवसांत 3 हजार 141 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी जून-जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 12 ते 14 वयोगटातील मुलांचाही लसीकरणाच्या टप्प्यात समावेश केला असून त्यांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेव्हॅक्स ही लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 54 हजार मुले असून त्यांच्यासाठी कोर्बेव्हॅक्स लसीचे दीड लाख डोस प्राप्त झालेले आहे.
दरम्यान, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 18 ते 44, 45 ते 59 आणि 60 च्या पुढील यांच्या लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पहावास मिळत आहे.
जिल्ह्यात आता सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी सर्व वयोगटातील लसीकरण करण्याकडे शासनाचा भर आहे. याआधीच 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.