Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कृषी उत्पन्न उपबाजार समिती समोरील पत्र्याच्या गाळ्यांना शनिवारी (दि.8) रात्री अचानक आग लागली. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. असून दुकानातील सर्व साहित्य जळाल्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, सरपंच किरण ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वांबोरी ग्रामपंचायतीचे पाण्याच्या टँकर तात्काळ घटनास्थळी पाठवल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शनिवारी (दि.8) रात्री नऊ वाजेच्या सुमारास वांबोरी परिसरात सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला.

त्या बस स्टॅन्डकडून गावात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील वांबोरी उपबाजार समितीच्या परिसरात असलेले वीज वाहक तारा एकमेकांना स्पर्श करून शॉटसर्किट होवून आगीच्या ठिणग्या पडताना रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शनी पाहिल्या.
या ठिणग्या गणेश गवते यांचे वीरभद्र इलेक्ट्रिकल्स या लाकडी टपरीच्या छतावर टाकलेल्या बारदानावर पडून काही वेळातच दुकानातून धूर व आगीचे लोळ बाहेर येताना नागरिकांनी पाहिले. त्यानंतर काही कळायच्या आतच या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करत दुकानातील टीव्ही किटचा स्फोट झाला.
या आगीत वीरभद्र इलेक्ट्रिकलचे सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच पूर्वेकडून शेजारीच असलेल्या सौरभ डोळसे यांचे सिद्धेश्वर मोबाईल व केक शॉपने तसेच पश्चिमेकडून असणाऱ्या सुरेश नेटके यांचे आदशं टायर या दुकानाला आगीने वेढले होते. काही वेळातच मोबाईल शॉपीसह टायर दुकानात आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले.
आगीत मोबाईल शॉपीमध्ये असलेले मोबाईल, फ्रिजसह लाकडी फर्निचर व काचेचे शोकेस व इतर साहित्य, असा सुमारे तीन लाख रुपये किंमतीची माल जळून खाक झाला. त्याचबरोबर आदर्श टायर दुकानातील टायर कॉम्प्रेसर मशीनसह टायर-ट्यूब तसेच इतर साहित्याचा क्षणात कोळसा झाला.
यामध्ये सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी वांबोरी ग्रामपंचायतीचे पाण्याचे टॅकर यासह हिंदुस्तानपेट्रोलियम पंपावरील व केएसबी कंपनीचे आग नियंत्रक स्प्रे-मशीन आणल्यामुळे आग आटोक्यात राहण्यास मदत झाली. त्यानंतर राहुरी नगरपालिकेचे अग्निशमन दलाने काल रविवारी (दि.9) पूर्णपणे आग विझवली.
वांबोरीच्या शेकडो तरुणांनी बजावली विशेष भूमिका
दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केलेले असताना अक्षरशः आगीतून दुकानातील साहित्य बाहेर ओढल्यामुळे काहीसे नुकसान कमी झाले. त्यामुळे या तरुणांचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे. यामध्ये भाऊ पटारे हे किरकोळ जखमी झाले असून दीपक गांधी, विशाल पारख, स्वप्निल गुंजाळ, प्रवीण कांबळे, गणेश दुधाडे, प्रवीण ढवळे, गंगाधर कुसमुडे, बबलू खंडागळे, जितेंद्र झंवर, रोहन गाडेकर, गणेश लोखंडे, राहुल अड्डल यांच्यासह शेकडो तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
अवकाळीने शेतकऱ्यांबरोबर दुकानदारांचे नुकसान
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह शनिवारी आपला कहर सुरूच ठेवत रात्री नऊ वाजेच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विज वाहक तारा एकमेकांवर घासून त्यामधून मधून पडणाऱ्या आगीच्या ठिणग्या वीरभद्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या पत्र्यावर पडल्या. त्यानंतर काही वेळातच दुकानातून आगीची लोळ बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. महावितरणच्या विद्युत वाहक तारा मुळेच स्पार्किंग होवून या दुकानांना आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.