Ahmednagar News : तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजमध्ये नोकरीस असणाऱ्या विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 45, रा. शेवगाव) यांच्याकडील दहा लाख रुपये चोरटयांनी तलवारीचा धाक दाखवत चोरून नेले होते.
ही घटना २८ डिसेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चेतन प्रमोद तुजारे (वय १९), समाधान विठ्ठल तुजारे (वय 20, दोघेही रा.वरुर, ता.शेवगांव) याना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १० लाख रुपये व मोटारसायकल असा १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अर्जुन ऊर्फ बाळू तुजारे हा फरार झाला.
अधिक माहिती अशी : २८ डिसेंबरला विठ्ठल सोनवणे हे तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बॅकेत देऊन 10 लाख रुपये रोख रक्कम बॅगेत घेऊन मोटार सायकलवर निघाले होते. त्याचवेळी दोन इसम तेथे आले व त्यांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून पैसे लुटून नेले होते.
या घटनेनंतरपोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले.
दिनेश आहेर यांनी 29 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, सचिन आडबल, संदीप दरंदले,
देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ मेघराज कोल्हे व भरत बुधवंत यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत रवाना केले.
पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन तपास केला असता दिनेश आहेर यांना गुप्त माहिती समजली की हा गुन्हा चेतन तुजारे याने केला आहे.
पोलिसांनी वरुर येथे जात त्यास ताब्यात घेतले. त्याने इतर दोन साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी शेवगाव पोलीस ठाण्यात हजर केले आहे.