भंडारदऱ्याची एकेरी वाहतुक व्यापाऱ्यांच्या मुळावर!

Ahmednagarlive24 office
Published:
Bhandardara

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा पर्यटनस्थळ म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर समजले जाते. यावर्षी माळशेज घाटासह अनेक ठिकाणी पावसाळ्यातील निसर्ग पर्यटन पर्यटकांसाठी बंद असल्याने भंडारदन्याला पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा दिसुन आला.

भंडारदरा पर्यटन स्थळावर अनेक महत्वाची निसर्ग पर्यटन असून रंधा धबधबा, वसुंधरा फॉल, कोलटेंभे धबधबा, नान्ही फॉल, नेकलेस फॉल, आशिया खंडातील सर्वात खोल दरी असणारी सांदनदरी, अमृतेश्वर मंदीर, घाटघरच्या धुक्यात हरवलेला कोकणकडा,

अशी विविध ठिकाणे पर्यटकांना खुणावत असतात. विक एंड ची जॉईंड सुट्टी सलग आल्या कारणाने भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता राजूर पोलिसांनी गृहीत धरून वाहतुक कोंडी टाळण्याठी एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबविला होता.

मात्र ही एकेरी वाहतुक पर्यटनावर आधारीत असलेल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्याच मुळावर उठली. पर्यटनासाठी भंडारदऱ्याची कांदा भजी, मक्याची कणस प्रसिद्ध असून अनेक आदिवासी तरुणांनी छोटी-छोटी टपरीवजा दुकाने थाटलेली असताना ही दुकाने ग्राहकाविनाच रिकामी पडून आहे.

दरवर्षी भंडारदरा धरण स्वातंत्र्य- दिनापूर्वीच भरत असते. यावर्षी मात्र पाऊसच नसल्याने धरण तर भरले नाहीच, परंतु पाऊसच नसल्याने पर्यटकांना भिजण्याचा आनंद घेता आला नाही, त्यात भंडारदरा धरणावर असलेला अंब्रेला धबधबाही बंद होता.

तर कोणत्याही प्रकारचा विसर्ग धरणामधुन सुरु नसल्याने भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या अधिपत्त्याखाली संगमनेर, अकोले व राजूर पोलिसांचा बंदोबस्त मात्र वाखाण्याजोगा होता.

यंदा एमएच १७ ची जत्रा भरलीच नाही!

भंडारदरा सांडव्याला दरवर्षी एमएच १७ या पासिंग असलेल्या उत्तर नगर जिल्ह्यातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र ही एमएच १७ १ ची जत्राच भरलेली दिसून आली नाही. एकेरी वाहतुक असल्याकारणे भंडारदरा अभयारण्यात फक्त एकाच बाजुने प्रवेश सुरु असल्याने शेंडी येथील प्रमुख मार्गावरुनही फक्त गाड्याच धावत होत्या. तर सांदण दरी व अभयारण्यात असणाऱ्या धबधब्यावरही गर्दी जाणवलीच नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe