३५ रुपये किलोवर गेलेला कांदा आता घसरू लागला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर १० ते १५ रुपये प्रतीकिलो झाले आहेत. बाजारात सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचा भाव कमी होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ३० ते ४० (प्रतिकिलो) रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र, आठवड्यांपूर्वी यात ८ ते १० रुपयांनी घसरण होऊन १५ ते २० रुपये प्रतिकिलो दर झालेले आहेत.
देशातील महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक कांद्याचे उत्पादन वाढल्याने कांदा किंमत यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच हे दर १५ एप्रिलपर्यंत असेच राहणार असून, आता जुना साठवणीतला कांदा बाजारात लवकरच दाखल होणार असल्याने कांद्याचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जाते.

सध्या उन्हाळी कांद्याची बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. आवक वाढत असल्याने कांद्याची किंमत कमी होऊ लागली आहे. दरम्यान, दररोज कांद्याच्या बाजारात किमती कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढत झाली आहे. आठवडाभरात ८ ते १० रुपयांनी प्रतिकिलो भाव कमी होत असून, आणखी आवक वाढल्यास आगामी काळात कांद्याची किंमत आणखी कमी येण्याची शक्यता आहे.
सध्या उन्हाळी आणि लाल कांद्याला सरासरी १५ ते २० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. उन्हाळी कांदा हा साठवणूक करून पुढील ८ महिने टिकण्याची क्षमता असल्याने मोठे व्यापारी उन्हाळी कांदा स्वस्त किमतीमध्ये घेऊन स्टॉक करून ठेवतात, यासाठी तेच व्यापारी कांद्याची किंमत कमी करून शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेतात.