कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव

Updated on -

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले जाते. सध्या कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याने कांद्याने शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. महागाईत कांद्याचे रोपे लागवड, मशागत, मजुरी आदी खर्चाचा विचार केल्यास हातातोंडाशी आलेले चांगले कांद्याचे पीक कमी भावात विकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

कांदा मार्केटला पाठवल्याशिवाय सध्या शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत येणाऱ्या खर्चाचा विचार करता सध्या कांद्याला मिळणारा दर हा परवडणारा नाही. सरासरी १३५० रुपये दर सध्या मिळत आहे. केंद्रसरकारने याबाबत विचार करून कांदा उत्पादकांना मदत देण्याची व २० टक्के निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी होत आहे.

दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कांदा लागवडीसाठीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाले असले तरी मागणी कमी आहे तसेच निर्यात शुल्क जास्त असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही.

लागवड, मशागत, खते, औषधे व काढणीसाठी एकरी ८० ते ८५ हजार रुपये खर्च करावे लागतात. सध्या कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. गेल्या महिन्यात याच कांद्याला २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता, त्यामुळे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी नाराज असून, त्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे.

महाराष्ट्र, राज्यस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांहून अधिक कांद्याची लागवड झाली आहे, त्यामुळे कांद्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe