विखे पाटील आय.टी.आय.मध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Published on -

नगर (प्रतिनिधी): डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.), एमआयडीसी, अहमदनगर येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकूण ३६८ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी केले आहे.

आजच्या काळात तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. तांत्रिक कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या संधी मिळतात. शिक्षण पूर्ण होताच नोकरीची संधी उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होते. आय.टी.आय.चे ठिकाण एमआयडीसी परिसरात असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा लाभ मिळतो.

संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षक, उत्कृष्ट प्रशिक्षण, आणि आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नगर, सुपा, पुणे, औरंगाबाद, मुंबई येथील नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली आहे.

ऑगस्ट २०२५ प्रवेश सत्रासाठी इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वायरमन, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, पेंटर जनरल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

२६ मेपासून व्यवसाय पसंती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी, एमआयडीसी, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News