आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला विरोध ; ३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Published on -

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी दि.३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांना मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले.

यावेळी वंचितबहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, अमर निर्भवणे, विनोद गायकवाड, गणेश राऊत, दिलीप साळवे, लताताई भांड, प्रकाश साळवे, दिलीप साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची भरतीत आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे.जिल्हा सहकारी बँकेच्या जाहीर झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

सरळ भरतीने संविधानाच्या कलमांकडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला जात आहे.सदर भरती बेकायदेशीरपणे संविधानाचे उल्लंघन
करून होत असून, समाजातील वंचित घटकावर अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा बँक हा शासनाचा उपक्रम आहे.त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्या करिता त्यांच्या सेवकांमध्ये ५२ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.जिल्हा बँकेचे सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेले आहेत, त्यात राखीव जागेची तरतूद आहे.

या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना जिल्हा बँक यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.जिल्हा सहकारी बँकेच्या नव्याने जाहीर केलेल्या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद रद्द करण्यात आलेली असून, बँकेकडे पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

बँक प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कुठलाही खुलासा आणि कुठलीही चर्चा न केल्याने दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या वतीने ३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe