Ahmednagar News : पाथर्डी क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने २४ डिसेंबर २०२३ रोजी येथील विठोबाराजे मंगल कार्यालयात वधु- वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, युवक,
युवती व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने राज्याचे प्रदुषण निर्मुलन संचालक दिलीपराव खेडकर यांनी केले आहे.
क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खेडकर बोलत होते. या वेळी आदिनाथ महाराज आंधळे, संभाजीराव पालवे, भगवानराव आव्हाड, महेंद्र शिरसाट उपस्थित होते.
या वेळी बोलताना खेडकर म्हणाले, समाजात मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. वीस वर्षापूर्वी झालेल्या भ्रूणहत्येचा हा परिणाम आहे. बावीस ते चाळीस वयोगटातील अनेक मुले लग्नाविना आहेत.
शेती दुष्काळाने वाया गेली. शेतकऱ्यांची मुले आर्थिक संकटात आली. शेतीचे उत्पन्न नसल्याने मुले वैफल्यग्रस्त होत आहेत. नोकरी नाही, लग्नही जमत नाही. विवाह संस्था अधिक बळकट व्हावी, युवकांसमोर अनेक पर्याय असावेत.
यासाठी समाजातील युवक युवती व पालक समोर यावेत, अशी अपेक्षा आहे. या वेळी समाजातील पालक, मुले व मुलीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे खेडकर म्हणाले. आदिनाथ महाराज आंधळे म्हणाले, समाजातील युवक व्यसनाधिनतेकडे झुकू नये, त्यांना रोजगार मिळावा.
त्यांचा विवाह व्हावा, यासाठी क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या माध्यमातून काम सुरु आहे. यामध्ये युवकांनी सहभागी झाले पाहिजे. या वेळी संभाजीराव पालवे यांचेही भाषण झाले. भगवानराव आव्हाड यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.