अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही ! जरांगे पाटलांची तोफ अहमदनगर जिल्ह्यात धडाडली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : हातातोंडाशी आलेला मराठा आरक्षणाचा घास मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असे म्हणत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज कर्जत मध्ये धडाडली.

मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे भांडेवाडी येथील अक्काबाई मंदिराजवळ मोठ्या उत्साहात अनेक युवकांनी स्वागत केले. उघड्या जीपमधून वाजत गाजत शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य हार तयार होता तर अनेक जेसीबींमधून फुलांचा वर्षांव केला जात होता. आयोजित सभास्थळी मोठ्या संखेने लोक जमा झाले होते. याठिकाणी मुलींनी जिजाऊ वंदना म्हटली.

मराठा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार सकल मराठा समाजाचे मुख्य समन्वयक वैभव लाळगे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना, मराठा समाजाने जागृत होण्याची गरज आहे, थोडे गंभीर व्हा, तोंडाजवळ आरक्षणाचा घास आला आहे. तो मिळवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. या वेळी तरी आपण मतभेद दूर ठेवले पाहिजेत.

आपण एकत्र राहिलो नाहीत तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. सध्या चारी बाजूने मराठ्यांना घेरले आहे. पण सरकार आता कसे आरक्षण देत नाही हेच आपल्याला पाहायचे आहे. या लढयात राजकारण न आणता मतभेद सोडून देऊन स्वतःच्या मुलांसाठी एकत्र यायचे आहे.

सरकारने आपल्याकडून मुदत घेतली आहे. २४ तारखेच्या आत आरक्षण दिले नाही तर त्यानंतरचे आंदोलन पेलणारही नाही व झेपणारही नाही असे म्हणत आपल्यापुढे लढण्याशिवाय पर्याय नाही. आगामी काळात फक्त आंदोलन शांततेतच करायचं, हे आंदोलन मोडायची ताकद कोणातच नाही. यापुढे कोणत्याही पोरांनी आत्महत्या करायची नाही. आता आपण गाफील राहून चालणार नाही, प्रत्येकाने घर घर पिंजून काढा. सर्वांना आरक्षण कशासाठी पाहिजे, हे समजून सांगा.

मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा दि. २२ रोजी मराठा समाजाच्या बैठकीत ठरणार असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मी एक इंचही मागे हटणार नाही व तुम्हीही हटू नका. माझ्यावर वेगवेगळे डाव टाकले जात आहेत, पण त्यांचे सगळे डाव उधळून लावले, असे म्हणत ओबीसीचे वरचे दोन चार व आपले दोन चार लई बेकार आहेत.

पूर्वीच ७० टक्के मराठे ओबीसी आरक्षणात आहेतच, खूप थोड्या मराठ्यांना आरक्षण नाही, त्यांना फक्त घ्या, असे आम्ही म्हणत आहोत. पण चुकीची माहिती देऊन ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे, आता तुम्हीच हे सर्वांना समजून सांगा माझी भाषा साधी आहे.

ती त्यांना समजत नाही, याला मी काय करू. मी माझ्या जातीची वेदना मांडत आहे. मी तुमच्यासाठी नाही, माझ्या जातीसाठी लढतो आहे. मी घरी झोपलो तर आरक्षणाचा घातच होईल. म्हणून मी घरीसुद्धा जात नाही. पुन्हा अशी संधी येणार नाही, विचार फुटू देऊ नका, एकत्र रहा, असे आवाहन शेवटी जरांगे पाटील यांनी केले.

मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केली असताना मी हार कसे स्वीकारू, असे म्हणत जरांगे पाटील यांनी फुले टाकण्यालासुद्धा अटकाव केला. त्यांच्या याच्या या कृतीने उपस्थितांची मने जरांगे पाटील यांनी जिंकली. सभेच्या ठिकाणी मोठमोठस्क्रीन लावण्यात आले होते.

बाहेरगावावरून येणाऱ्या चार विविध ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती सभेच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या वाटल्या जात होत्या. लाखोच्या संखेने उपस्थित मराठा बांधवानी अत्यंत शांततेत सभा पार पाडली.

जो आरक्षणाला विरोध करील, त्याला आपण वाजवलाच म्हणून समजा. तो असो नाही तर कुणीही असो, टप्प्यात आला की वाजविलाच प्रत्येक पक्षात माझ्या जातीने यांना मोठे केले. आमचे उपकार समजायचं तर तेच विरोध करत आहेत.

त्यामुळे आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आपण सोडायचे नाही, असे जरांगे यांनी आवाहन करताना याचा अर्थ आपल्याला शांतता भंग होऊ द्यायची नाही, असेही म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe