अहमदनगर : मनपाची निवडणूक लांबली अन्यथा ही जयंती मोठ्या प्रमाणात इव्हेंट म्हणून साजरी झाली असती. महापुरुषांच्या जयंती, उत्सव इव्हेंट म्हणून नव्हे तर त्यांचे विचाराचे पाईक होण्यासाठी साजरे होण्याची गरज आहे. असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना सावित्रीच्या लेकी पुरस्काराने आमदार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य भावी पिढी समोर घेऊन जावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले महापुरुष व रणरागिनींनी समाजासह देशाला दिशा दिली.
त्यांचे कार्य गुगलवर शोधावे लागते, ही या पिढीची मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या महापुरुषांचे कार्य, विचार व वारसा सर्वांनाच ज्ञात असणे आवश्यक असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.