अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून
त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरम्यान राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे.
निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. सध्या खासगी व सरकारी रुग्णालयांत सर्दी, ताप व खोकला तसेच डोकेदुखीचे रूग्ण दिसून येत आहेत.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे. हिवाळ्याचा अंतिम टप्पा अन् उन्हाळ्याचा प्रारंभ यामुळे सर्वत्र वातावरणात बदल झाला.
सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असे दुहेरी वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. असे वातावरण राहिल्यास याचा घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहेत.
खासगी व सरकारी रुग्णालयांत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यातच पुन्हा करोनाची तिसरी लाट आली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होत आहे.
व्हायरल इन्फेक्शन की करोनाची लक्षणे यामुळे मोठा संभ्रम वाढत आहे. काहींना करोनाची लक्षण असली तरी व्हायरल समजून करोनाचे उपचार न घेतल्यास यातून करोनाचे पेशंट वाढण्याची भिती आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम