पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Published on -

शिर्डी, दि. २ – प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ९ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी शिर्डी यांचे कार्यालय, राहाता प्रशासकीय इमारत (राहाता तहसील कार्यालय) पहिला मजला, राहाता येथे ३ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवार १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी करण्यात येईल.

या निवडणुकीसाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार अमोल मोरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी १९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe