अहिल्यानगर: दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या, निकाल लवकरच लागतील. या टप्प्यावर पालकांना मुलांच्या करिअरबाबत मोठी चिंता असते. “मुलाने कोणता अभ्यासक्रम निवडावा?”, “त्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे?”, “त्याची खरी क्षमता कशात आहे?” – असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात.
योग्य निर्णय घेण्यासाठी काही चाचण्या उपयुक्त ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य चाचणी केल्यास मुलाच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येते.

मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्षेत्रासाठी योग्य आहे? त्याचा जन्मजात कल कोणत्या दिशेने आहे? कोणत्या विषयात मेहनत घ्यावी लागेल? – हे ओळखण्यासाठी कल चाचणी (Aptitude Test) उपयुक्त ठरते. डीएमआयटी (DMIT) टेस्टद्वारे मुलाची बुद्धिमत्ता, सामाजिक कौशल्य, शिकण्याची पद्धत आणि अभ्यासाची क्षमता समजते.
बालरोगतज्ज्ञ डॉ. सूचित तांबोळी यांच्या मते, मुलांच्या वय आणि बौद्धिक विकासाचा विचार करूनच शिक्षणाची निवड करावी. त्यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी लोअर केजी आणि सहा वर्षांपूर्वी पहिलीला प्रवेश देऊ नये. मुलांच्या बौद्धिक, सामाजिक, भाषा व शारीरिक विकासाचा विचार करणे गरजेचे असते. काही मुलांना संकल्पना समजायला वेळ लागतो, अशांना उशिरा शाळेत घालावे.
दहावी किंवा बारावीनंतर योग्य क्षेत्र निवडण्यासाठी मुलाची कल चाचणी करणे महत्त्वाचे असते.
ही चाचणी केल्यास मुलाचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे स्पष्ट होते.
जर एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचं असेल, पण त्याच्या सामाजिक कौशल्यांचा अभाव असेल, तर त्यावर सुधारणा करता येते. प्रत्येक मुलाची स्वभाववैशिष्ट्ये, क्षमता आणि त्याला योग्य दिशा कशी द्यावी, याचा अंदाज घेता येतो.
कल चाचणी म्हणजे काय?
ॲप्टीट्यूड टेस्ट (Aptitude Test) – एखादी गोष्ट किती लवकर आत्मसात करता येते, हे तपासण्यासाठी, ॲबिलिटी टेस्ट (Ability Test) – मुलाची नैसर्गिक क्षमता आणि कौशल्ये जाणून घेण्यासाठी, डीएमआयटी टेस्ट (DMIT) – वैज्ञानिक पद्धतीने मुलाची बुद्धिमत्ता, क्षमता आणि करिअरची योग्य दिशा शोधण्यासाठी.
या चाचणीद्वारे मुलाची नैसर्गिक क्षमता आणि योग्य करिअर क्षेत्राचा अंदाज घेता येतो. त्यामुळे इंजिनिअर, डॉक्टर, वैज्ञानिक, अभिनेता, खेळाडू, संगीतकार, लेखक इत्यादी करिअरच्या योग्य मार्गाचा अंदाज घेतला जाऊ शकतो.
मुलांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी पालकांनी केवळ मार्कांवर अवलंबून न राहता त्याच्या कलाचा विचार करावा. योग्य चाचण्या आणि मार्गदर्शन घेतल्यास मुलांसाठी सर्वोत्तम करिअर निवडणे सोपे होईल.