Parner News : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असला तरी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गृहिणी लोणच्याची तयारी जोरात करीत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. आहारात चवदार स्वाद आणणार कैरीचे लोणचे सर्वाधिक लोकप्रिय आहे. लिंबू, आवळा व इतर प्रकारच्या लोणच्यांपेक्षा कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती मिळते.
त्यामुळे बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामीण परिसरात लोणच्याच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे, त्यामुळे कच्च्या आंब्याच्या कैऱ्यांना मोठी मागणी आहे. गावरान जातीच्या कैऱ्यांची स्थानिक शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत.

वर्षभरासाठी लोणचे तयार करण्याची परंपरा असल्याने ग्राहक आवडीने कैऱ्या विकत घेताना दिसत आहेत. शहरी बाजारासोबत आठवडी बाजारातही कैऱ्यांची विक्री जोमात आहे. घराघरात कैरीचे लोणचे वर्षभर जेवणाची लज्जत वाढवत असते,
त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही भाववाढ असूनही कैऱ्यांना मोठी मागणी आहे. शहरांसह ग्रामीण बाजारपेठांमध्ये कैऱ्यांची उलाढाल वाढली आहे, बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न विक्रेते करत आहेत.
ग्रामीण भागात काही महिला घरगुत्ती पद्धतीने लोणचे तयार करून विकत आहेत बचत गटांच्या महिलांनीही या व्यवसायात उडी घेतली असून, लोणच्यासाठी लागणारे विविध मसाले देखील तयार करून बाजारात उपलब्ध करून देत आहेत. लोणच्यासाठी आंबा निवडताना महिला वर्ग विशेष काळजी घेतो. कडक, जाड सालीचा, भरपूर मांस असलेला व आंबट चव असलेला आंबा लोणच्यासाठी उत्तम मानला जातो. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कैऱ्यांपासून खार- लोणचे बनवण्याचा मुख्य हंगाम असतो.
त्यामुळे रस्त्याच्याकडेला छोटे दुकान थाटून कैऱ्यांची थेट विक्री केली जाते. अनेक घरांमध्ये घरगूती पद्धतीने मीठ, हळद लावून कैऱ्या खाल्या जातात, तर काही जण विविध मसाले वापरून चविष्ट लोणचे तयार करतात.
काही ठिकाणी रेडिमेड मसालेही उपलब्ध आहेत. महिलांनी पारंपारिक चव टिकविण्यासाठी स्वतः मसाला तयार करण्यालाच अधिक पसंती दिली आहे. गृहिणींच्या म्हणण्यानुसार जास्त आंबट कैरीचे लोणचे काही वर्षे टिकते. खराब होत नाही. कैरी घेतल्यावर ती फोडून तिला लहान चिऱ्या तयार करून लोणच बनविले जाते.
पूर्वी घरीच कैरी फोडली जायची. दररोजच्या जेवणात लज्जत आणण्यासाठी कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती दिली जाते. लोणच्यामध्येही खवय्यांची पसंती कैरीच्या लोणच्यालाच जास्त असते. सध्या गावरान कैरी विक्रीसाठी स्थानिक भागातून बाजारात येत आहे.