पाथर्डी होऊ लागलीये गुन्हेगारांचे माहेरघर ! कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा ; पोलिसालाही ब्लॅकमेल…

Published on -

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : पाथर्डी शहरात सध्या गुन्हेगारी टोळ्यांकडून ताबेमारी केली जात असून नागरिकांना व व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून दहशत निर्माण केली जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कडक पावले उचलावीत तसेच स्थानिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करुन कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जावी,अशी मागणी प्रताप ढाकणे यांनी केली आहे.

खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण याने पाथर्डी शहरात आजिनाथ खेडकर व विष्णूपंत ढाकणे या जमीन मालकांना धमकी दिली आणि त्यांच्या मालकीची जमीन रिकामी करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.या दोघांना एका महिलेने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.या अनुषंगाने ढाकणे म्हणाले, हे गंभीर प्रकरण असून आपल्या कानावर इतरही अनेक तक्रारी आल्या आहेत असे सांगितले आहे.

काही व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारे त्रास देऊन जागा बळकावण्याचा प्रयत्न झाला असून ही ताबेमारी आहे.याकडे लक्ष देऊन पोलिस, नगर परिषद व महसूल प्रशासन यांनी कडक पावले उचलावीत.आपण पोलिस अधीक्षकांना भेटूनही या सर्व गंभीर प्रकारांकडे लक्ष वेधणार आहोत. प्रशासनाने कडक पावले उचलून जे लोक दादागिरी करत कायदा सुव्यवस्था हातात घेत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसालाही केले ब्लॅकमेल

पाथर्डी पोलिस ठाण्यातीळ एक पोलीस कर्मचारी एका महिलेला वॉरंट बजावण्यास गेल्यावर त्यालासुद्धा ब्लॅकमेल केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.याबद्दल पोलिस ठाण्याकडून पोलिस कर्मचाऱ्यालाही संरक्षण दिले गेले नाही, असा प्रकार कानावर आला आहे. असे असेल, तर ही बाब गंभीर आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी ढाकणे यांची मागणी आहे.

नगर परिषदेने केली पोलिसांकडे संरक्षणाची मागणी

नगर परिषदेच्या हद्दीतील एक अतिक्रमण काढण्यासाठी परिषदेने पोलिसांकडे संरक्षण मागितल्यावरही पोलिसांनी संरक्षण दिले नाही. पोलिसांना जर एक अतिक्रमण हटविण्यासाठी सुद्धा संरक्षण देता येत नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राखणार ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गुन्हेगार मोकाट !

ज्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्हेगारांना अटक व्हायला हवी,हे लोक जामिनावर बाहेर असल्यावरही पोलिसांनी त्यांच्यावर कडक नजर ठेवायला हवी. पोलिस गुन्हेगारांवर लक्ष ठेवत नाहीत म्हणून पाथर्डी तालुक्यात गैरप्रकार वाढत चालले असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe