Ahmednagar News : दुर्दैवाने ४० वर्षात मतदार संघात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिले. त्यामुळे सत्ताधारी आमदार काय करू शकतो, हे आपण अवघ्या अडीच वर्षांत करून दाखविल्याचे मतदारसंघातील जनतेने पाहिले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
काल गुरुवारी वारी येथील २९ कोटी निधीतील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शंकरराव कोकाटे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वारी येथे मागील पाच दशकापासून प्रलंबित असलेल्या गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे,

वारी ते डोणगाव शिवरस्ता डांबरीकरण व वारी ते तालुका हद्द रस्त्यावरील पुल वारी सब स्टेशन येथे बसवण्यात आलेला नवीन ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर व ओपन जिम साहित्याचे आ. काळे यांच्या हस्ते काल गुरूवारी लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ते म्हणाले की, माजी आमदार अशोक काळे यांनी १० वर्ष विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील मतदार संघातील प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न सोडविले. यामध्ये गोदावरी नदीवरील अनेक पूल, शासकीय इमारती, प्रमुख रस्ते आदी महत्वाची विकास कामे पूर्ण करून दाखविली.
मला दिलेल्या संधीतून आतापर्यंत ४ वर्षात वारी गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार निधीतून ५५ कोटी रुपये निधी दिला आहे. आतापर्यंत एवढा निधी वारी गावास कधीच मिळाला नाही. तुम्ही दिलेल्या संधीतून तुमच्या परिसराचे जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडविता येतील, यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले.
सुरुवातीला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागेल असे वाटले होते. परंतु घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार झालो आणि अडीच वर्षात वारी व परिसरातील रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत प्रश्न सोडविले.
एक वर्ष विरोधी पक्षाचा देखील आमदार होतो. मात्र निधी आणण्यात मला अडचण आली नाही. परंतु पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा आमदार झालो आणि मतदार संघाच्या विकास कामांना जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, यासाठी पाठपुरावा करीत आहे.
पाच दशकांचा प्रलंबित असलेला वारी पुल व्हावा, हे माजी आमदार अशोक काळे यांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेबरोबरच विकासाचा अनुशेष भरून काढल्याचे समाधान मिळत आहे.- आ. आशुतोष काळे.













