Ahmednagar News : मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा, माणसांना पाणी व हाताला काम नाही. अशा ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जातीभेद केला जात आहे.
मागील काळात मक्याचे कणीस, नारळ, असे विविध प्रकारचे चिन्ह घेणारे आता आगामी निवडणुकीत कुठले चिन्ह घेणार, आपल्याला माहित नाही, अशी टीका मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत केली.
येथील मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी घुले बोलत होते. या वेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश आव्हाड, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव डोमकावळे,
विलास रोडी, दत्ता टेंभुरकर, संस्थेचे प्रमुख प्रताप निहाळी, बंडू बोरुडे, बाळासाहेब ताठे, फारुख शेख, अरविंद सोनटक्के, दत्ता टेंभुरकर, किसन आव्हाड, नासीर शेख, मुन्ना खलिफा, अकबर शेख, अश्फाक शेख, आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना घुले म्हणाले, जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाडा विभागाला मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र, धरणासाठी आपल्या भागातील शेतकऱ्यांनी जमिनी देऊनही अपल्याला शेतीचे तर सोडा साधे नळाला देखील आठ आठ दिवस पाणी मिळत नाही.
मतदारसंघामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढत असून, आपल्या शेजारी बसणाऱ्या माणसाच्या खिशात कट्टा तर नाही, ना अशी भीती आता सर्वांनाच वाटत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आपले मौन कधी सोडणार, असे विचारण्याची दुर्दैव वेळ आपणावर आली आहे.
भुलभुलैय्या व जातीवाद करून फक्त सत्ता मिळत असते. मात्र, मतदार संघात विकास होत नसतो. यासाठी डोळ्याला बांधलेली पट्टी व तोंडाला बांधलेली चिकटपट्टी काढावी लागते. मात्र, येथील कुठल्याही प्रश्नावर बोलायला लोकप्रतिनिधी तयार नाहीत,
त्यामुळे आगामी काळात पाथर्डी- शेवगाव मतदार संघात ज्याला कोणी वाली नाही, त्यासाठी मी अहोरात्र आपणासोबत आहे, असे भावनिक आवाहन घुले यांनी केले. सूत्रसंचालन हुमायून आतार, प्रास्ताविक बंडू बोरुडे, तर आभार बबलू बोरुडे यांनी मानले.