आदिवासींचा ‘बापमाणूस’ हरवला! धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आदर्श पिचड पॅटर्न तर राज्यात नेत्रदीपक अशी राजकीय कामगिरी; जाणून घ्या मधुकरराव पिचड यांची कारकीर्द

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होताच व त्यास चार कालवे निर्माण करण्याबरोबरच निळवंडे धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यामध्ये देखील मधुकररावजी पिचड यांचा मोठा वाटा होता.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची काल 84 व्या वर्षी प्राणज्योत मालवली व त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राजकीय आणि सामाजिक पटलावर उमटली. मधुकरराव पिचड म्हटले म्हणजे एक आदिवासी समाजाचा नेता व आदिवासींच्या विकासासाठी कायम पुढे असणारा नेता म्हणून त्यांची एक ओळख आपल्या डोळ्यासमोर येते.

त्यांनी आदिवासी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले असून त्यांचे हे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. साधारणपणे दीड महिन्या अगोदर मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आला होता व त्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते व उपचारादरम्यानच त्यांचे काल निधन झाले. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचे नाव खूप मोठे आदराने घेतले जाते त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांची मनाला भावुन जाणारी राजकीय आणि सामाजिक कारकीर्द होय.

अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यात जलक्रांती घडवून आणण्यासाठी होते मोठे योगदान
आपण जर अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी जलक्रांती घडवून आणण्याच्या कामी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे मोठे योगदान आहे. जलक्रांतीच नाही तर संपूर्ण राज्यांमध्ये आदिवासी विकासाचे एक आदर्श रोल मॉडेल त्यांनी तयार केले होते व आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अफाट असे काम केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होताच व त्यास चार कालवे निर्माण करण्याबरोबरच निळवंडे धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यामध्ये देखील मधुकररावजी पिचड यांचा मोठा वाटा होता.

त्यांचे जर संपूर्ण आयुष्य बघितले तर गोरगरीब शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडावा यासाठी खर्ची पडले असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

आदिवासी शेतकरी शोषणाविरोधातील आंदोलन हे त्यांचे आयुष्यातील होते पहिले आंदोलन
आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात त्यांनी केलेले आंदोलन हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते व आंदोलनाच्या माध्यमातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला होता.

जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी उन्नती सेवा मंडळ ही राजुर मधील पहिली शैक्षणिक संस्था स्थापन करून सहकारी तत्त्वावरील पहिली दूध संस्था सुरू करणारे दूरदर्शी व्यक्तित्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणच नाही तर समाजकारण तसेच शिक्षण, कृषी, सहकार, सिंचन आणि इतकेच नाही तर धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातून देखील त्यांनी आपल्या सडेतोड भूमिकेतून कर्तुत्वाची छाप पाडली होती.

ते स्वातंत्र्य सेनानी तसेच एक थोर विचारवंत, राजकीय क्षेत्राचे महान भाष्यकार व महाराष्ट्राचे प्रधान मास्तर आदरणीय कै. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या संपर्कात घडले व त्यांचे लाडके व आदर्श विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभलेले पिचड राज्याच्या जडणघडणीसह अकोले तालुक्याच्या विकासाचे भाग्यविधाते देखील ठरले.

त्यांच्यावर प्रामुख्याने प्रधान मास्तरांचा विचारांचा खूप मोठा प्रभाव होता व तोच वसा आणि वारसा उरी बाळगत त्यांनी महाराष्ट्र राज्यातच नाही तर भारतातील आदिवासी जमाती व जनजातीचे रक्षण व संरक्षण होण्याबाबत त्यांच्या कामगिरीचा ठसा उमटवला.

त्यांची राजकीय कारकीर्द जर बघितली तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व 1980 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून राज्य शासनाच्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले व त्यानंतर सातत्यपूर्ण कौतुकास्पद अशी वाटचाल केली व कधीच मागे वळून पाहिले नाही.

राज्याच्या पटलावरील त्यांची राजकीय कामगिरी बघितली तर त्यांनी कृषी, आदिवासी विकास, दुग्ध विकास, पशुसंवर्धन इत्यादीं सह अनेक महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी स्वीकारली. अगोदर राज्यमंत्री व त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी पार पाडली.

इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्यात असलेल्या संघटनात्मक गुणांच्या जोरावर दादासाहेब रूपवते व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब हांडे यांच्या अनमोल सहकार्यातून 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली व जोपर्यंत सिताराम गायकर हे अध्यक्ष पदावर आले तोपर्यंत मधुकर रावजी पिचड या कारखान्याचे अध्यक्ष होते व त्यांनी अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली.

अकोले तालुक्यात 17 छोट्या धरणांच्या निर्मितीमध्ये सहभाग
इतकेच नाही तर महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प, आदिवासी घुसखोरी रोखण्याविरोधातील कायदा, सन 2000 चा आदिवासींसाठीचा पेसा कायदा, भंडारदराच्या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व तसेच भंडारदरा धरणातील पाण्याचे फेरवाटप इत्यादी प्रकारचे लढे त्यांनी उभारून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी यशस्वी देखील केली.

विशेष म्हणजे त्यांना निळवंडे धरणाचे जनक म्हणून ओळखले जाते व याच धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यामध्ये देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

इतकेच नाही तर अकोले तालुक्यात 17 छोट्या धरणांची निर्मिती करण्यामध्ये देखील त्यांनी मोलाची भूमिका पार पडली. या सगळ्या प्रकारच्या कामगिरीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवन साधना पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

एकेकाळी होते शरद पवारांचे खंदे समर्थक
मधुकर रावजी पिचड हे भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते व शरद पवार यांचे खंदे समर्थक त्यांना मानले जायचे. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी नेतृत्व केले होते. परंतु 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात म्हणजेच भाजपात प्रवेश केला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवनामध्ये त्यांनी आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात खूप मोलाची कामगिरी पार पाडली. त्यामुळे त्यांची ही कारकीर्द अख्ख्या महाराष्ट्राच्या जनमानसात कायम असणार राहील हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe