Ahmednagar News : पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेतील १२६ झाडे तोडल्याप्रखरणी गावातीलच तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी शशिकांत नजान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेची पिंपळगाव माळवी येथे सातशे एकर जागा आहे. या तलावाजवळील क्षेत्रात हजारो झाडे आहेत. मागील काही दिवसात या ठिकाणची अनेक झाडे तोडून नेण्यात आली. या झाडांच्या लाकडाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.
महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी मागील पाच ते सहा दिवस वृक्षतोड झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. त्यानंतर ही फिर्याद देण्यात आली आहे. १७ मे रोजी तेथे वृक्षतोड सुरू असल्याची माहिती गोरक्षनाथ भाऊसाहेब आढाव (रा. पिंपळगाव माळवी) यांनी नजान यांना फोन करून कळविली.
त्यानंतर नजान यांनी सहकाऱ्यांसह तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा शिंदे झाडे तोडत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्याद देण्यात आली. ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा आरोप आहे. त्यानुसार पोलिसांनी बेकायदा वृक्षतोड आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.