नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेबाबात पोलीस प्रशासन सतर्क; घेतला मोठा निर्णय: पोलीस बंदोबस्त देखील केले बदल

Published on -

अहिल्यानगर : सध्या राज्यातील प्रसिध्द अशी मढीची यात्रा सुरू आहे .मात्र त्यात नागपूरमध्ये झालेली दंगल व स्थानिक वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र मढी येथे यावर्षी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीन लाख भाविकांची मंगळवारी सायंकाळपर्यंत मढी येथे गर्दी झाली होती.

रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानंतर बहुसंख्य यात्रेकरू नाथषष्ठीसाठी पैठण येथे जातील. चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेकडे भटक्यांची पंढरी म्हणून देखील बघितले जाते. १८ पगड भटक्या जातींचे भाविक येथे राहून विविध धार्मिक विधी करतात. यात्रेत यंदा बाहेर गावचे नाथसंप्रदायाची परंपरा पाळणारे व देवावर श्रद्धा असणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गर्दी झाली असून,

विक्रेत्यांकडील नवनवीन मालामुळे ग्राहकांना विविध खाद्यपदार्थ व साहित्य खरेदीची मोठी संधी यामुळे मिळाली आहे. संपूर्ण २५ किलोमीटरचा वर्तुळाकार परिसर यात्रामय होऊन यंदा पैठण येथे जाणाऱ्या अनेक दिंड्या मढी मार्गे आल्याने दुपारनंतर अचानक गर्दी वाढली. लोणावळा, पनवेल, संभाजीनगर, नांदेड, नाशिक, पुणे या भागातील भाविकांच्या मंडप उभारणीचे काम पूर्ण झाल्याने आखाडा प्रमुखांचा दरबार सुरू झाल्याचे चित्र सायंकाळी ठिकठिकाणी बघायला मिळाले.

अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर यंदा यात्रेत देवाच्या नावावर पशुहत्या झाली नाही. अवैध धंदे पूर्णपणे बंद आहेत. तिसगाव, करंजी येथील पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मढी ग्रामपंचायत हद्दीबाहेर दुकाने थाटून मढीपेक्षा कमी भावात मालविक्री सुरू केली आहे. मढी- मायंबा असा दहा किलोमीटरचा घाट रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीत सापडून मायंबा येथील पार्किंग आत्ताच एक किलोमीटरच्या पुढे गेली आहे.

देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त, कर्मचारी, तसेच सरपंच , ग्रामविकास अधिकारी आदींसह सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र नागपूर दंगलीची पार्श्वभूमी, औरंगजेबाच्या कबरीचा विषय , स्थानिक पातळीवर जागृत झालेल्या हिंदुत्ववादी संघटना, मढी येथील वाढलेला जातीय तणाव, या पार्श्वभूमीवर पोलीस बंदाबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे.

असा आहे तगडा बंदोबस्त

मंदिर परिसरात व यात्रा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा प्रथमच२० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. एक डीवायएसपी, पाच पोलीस निरीक्षक, २० अधिकारी,१५० पुरुष कर्मचारी, १५ महिला कर्मचारी, १३५ होमगार्ड, एक आरसीपी व एक एसआरपी प्लाटून, देवस्थान समिती व ग्राम पंचायतीचे विशेष सुरक्षारक्षक तैनात करण्यात येऊन करंजी घाट, तिसगाव, अमरापूर, पाथर्डी, मोहटा, माणिकदौंडी घाट, टाकळी फाटा, अशा भागात फिरतीग्रस्त पथके तैनात करून शहरात वाहतूक नियंत्रणासाठी वाढीव पोलीस तैनात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe