नगरमध्ये हरवलेल्या ५ वर्षीय बालिकेला पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटांत शोधून केले पालकांच्या हवाली

Published on -

१५ मार्च २०२५ नगर : आई वडिलांपासून नकळत हरवलेली ५ वर्षीय बालिकेचा कोतवाली पोलिसांनी तत्काळ हालचाल करून अवघ्या ४० मिनिटात शोध घेत तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरातील रोशन कुमार सिंग हे त्यांच्या कुटुंबासह शहरातील लहान मुलांच्या दवाखान्यात तपासणी करिता आले होते. सिंग कुटुंब दवाखान्यात तपासणी करुन निघाले असता त्यांच्या नकळत त्यांची पाच वर्षाची मुलगी अवनी सिंग ही आई-वडिलांचा हात सोडून रस्त्यावर आली आणि कोठेतरी निघून गेली.

मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच सिंग कुटुंबीय गडबडून गेले. सौ सिंग यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आजूबाजूला मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलीस ठाण्यात जाऊन सिंग यांनी मुलगी हरवल्याचे सांगितले असता पोलिसांनी त्यांच्याकडे मुलीबाबत चौकशी केली.

हा प्रकार नुकताच घडलेला असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलिसांना तात्काळ मुलीचा शोध घेण्याकरिता रवाना केले.कोतवाली पोलीस तातडीने दुचाकीवरून मुलीच्या शोधार्थ निघाले.पोलिसांनी घुमरे गल्ली, आशा टॉकीज चा परिसर, माळीवाडा परिसरात कसून शोध घेतला असता माळीवाड्यातील रासकर गल्ली येथील सोळा तोटी कारंजा जवळ ती बालिका रडत असताना दिसून आली.

पोलिसांनी तात्काळ सिंग कुटुंब यांना कळवून तेथे बोलाविले व सौ सिंग यांना मुलीसह रिक्षात बसून पोलीस ठाण्यात आणले.पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटात बालिकेचा शोध लावल्याने सिंग कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी कोतवाली पोलिसांचे मनापासून आभार मानले.

ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शन व सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल याकुब सय्यद, विशाल कुलकर्णी, अनुप झाडबुके आणि राजेंद्र केकान यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe