अहिल्यानगर जिल्ह्यातील रहस्यमय बेपत्ता प्रकरण 48 तासांत पोलिसांनी महिला शोधून काढली!

Published on -

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एका विवाहित महिलेच्या बेपत्ताच्या घटनेने गावात मोठी खळबळ उडवली. सदर महिला गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तिच्या वस्त्रांचे काही तुकडे, गवत कापण्याचा विळा, मोबाईलचे कव्हर, बांगड्यांचे तुकडे आणि मंगळसूत्र सापडले. विशेष म्हणजे, त्या विळ्यावर रक्ताचे डाग असल्याने ग्रामस्थांना संशय आला की, बिबट्याने हल्ला करून तिला ओढून नेले असावे. या अफवेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांची धावपळ
महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर जमा झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. तातडीने वन विभागाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. 300 ते 400 ग्रामस्थांनी जवळपास 300 एकर परिसर पालथा घालून संपूर्ण रात्रीभर महिलेचा शोध घेतला. मात्र, कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.

पोलिसांचा तपास

महिलेचा कोणताही ठावठिकाणा न मिळाल्याने अखेर राहुरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना कळाले की, सदर महिला नेवासा तालुक्यात आहे. त्यानंतर तातडीने शोधमोहीम राबवून अवघ्या 48 तासांत पोलिसांनी तिला सुखरूप परत आणले.

बिबट्याला नाहक बदनाम केले…

महिला सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे बिबट्याला नाहक बदनाम केले गेले. कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे भविष्यात अशा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी योग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांना उमगले.

पोलिसांची महत्त्वाची भूमिका

या प्रकरणाच्या तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे, पोलीस नाईक गणेश सानप, हवालदार विकास वैराळ, सागर नवले, अंबादास गीते, प्रमोद ढाकणे आणि सायबर सेलचे सचिन धनाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या वेगवान तपासामुळे बिबट्यावर उगाचच आलेले संशयाचे ढग दूर झाले आणि ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe