अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी पहाटे पाठलाग करून पकडला तब्बल ९ किलो गांजा

Published on -

अहिल्यानगर : नगर-पुणे रोडवर रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग करून त्याच्याकडून ९ किलो गांजा जप्त केला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे.

हा गांजा नेमका कुठून आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना शंका आहे की यामागे गांजा विक्रीचं मोठं रॅकेट असू शकतं.

या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीचं नाव साहिल संतोष सूर्यवंशी (वय २०, रा. वाघगल्ली, नालेगाव, अहिल्यानगर) असं आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजता पोलिस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांचं पथक नगर-पुणे रोडवर कोठी चौकाकडे जात होतं.

त्याचवेळी एक व्यक्ती मोपेडवरून समोरून येताना दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू केला. पळत्या दुचाकीस्वाराने आपली गाडी अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या आवारात थांबवली. पोलिसांनी लगेच त्याला पकडलं. त्याच्याकडे एक निळ्या रंगाची गोणी होती. ती तपासली तर त्यात गांजा सापडला.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, पण सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. नंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची मोजणी केली गेली. एकूण ९ किलो २०० ग्रॅम वजनाचा, म्हणजेच १ लाख २० हजार रुपये किमतीचा गांजा त्याच्याकडे मिळाला.

पोलिसांनी त्याला अटक केली. ही सगळी कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

पोलिसांच्या मते, मोठ्या प्रमाणात गांजा आणून त्याच्या छोट्या-छोट्या पुड्या बनवल्या जातात. या पुड्या टपऱ्यांवर विक्रीसाठी पाठवल्या जातात. टपरीचालक गांजा आणि सिगारेट एकत्र विकतात, त्यामुळे टपऱ्यांवर गांजा सहज मिळतो.

शहरातली तरुण पिढी गांजाच्या विळख्यात अडकली आहे. गांजा विक्रीतून रोज मोठी रक्कम उलाढाल होत असल्याचंही बोललं जातंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe