नगर शहरात सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ८ मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ, नगर क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपीचे नाव फुरकान अन्वर कुरेशी (वय २५, रा. नागरदेवळे फाटा, ता. नगर) असे असून, पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार दिपक शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती धारदार तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) जगदीश मुलगीर यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

पोलीस पथकाने नगर क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. काही वेळाने पोलिसांनी वर्णनानुसार एका तरुणाला तलवार घेऊन फिरताना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ वेगवान कारवाई करत त्याला अडवले. झडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला लपवलेली धारदार तलवार आढळली.
त्याचे नाव विचारता त्याने स्वतःला फुरकान अन्वर कुरेशी असल्याचे सांगितले. भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
ही कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अंमलदार कैलास सोनार, दिपक शिंदे, विलास गारुडकर, रवी टकले, पांडुरंग बारगजे, अंकुश कासार, कैलास शिरसाठ, समीर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.