अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये सतत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोवीस तास पहारा असतो. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी या पोलिसांना योग्य निवाऱ्याची सोय नव्हती.
अनेकदा त्यांना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली थांबावे लागते. यावर तोडगा म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, शहरासह जिल्ह्यातील १२ महत्त्वाच्या चौकांमध्ये पोर्टेबल पोलिस चौक्या उभारण्याचे ठरवले आहे.

अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकूण १४ तालुके आणि ३४ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेत पोलिस चौक्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाली असून, नवीन १२ पोर्टेबल पोलिस चौक्यांसाठी निधीही मंजूर झाला आहे.
ही पोर्टेबल चौकी आधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये दोन खोल्या असतील. त्यात एक बेडरूम, टॉयलेट आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, या चौक्या मोबाइल व्हॅनच्या धर्तीवर तयार केल्या जात असल्याने त्यांना कुठेही हलवता येऊ शकते. गरज भासल्यास जेसीबीच्या मदतीने या चौक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतील.
सध्या पहिल्या टप्प्यात केडगाव बायपास, शेंडी बायपास, गुहा (ता. राहुरी), वडगावपान (ता. संगमनेर), भगतसिंग चौक (श्रीरामपूर) आणि आणखी एका ठिकाणी अशा एकूण सहा पोलिस चौक्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. उर्वरित सहा चौक्यांसाठी जागेचा शोध सुरू असून, लवकरच त्या देखील कार्यान्वित होतील.
अहिल्यानगर जिल्ह्यातून नगर-मनमाड, पुणे, कल्याण आणि सोलापूर हे प्रमुख महामार्ग जातात. या महामार्गांशी जोडणाऱ्या बायपास रस्त्यांवरही अनेक महत्त्वाचे चौक आहेत. विशेषतः शेंडी, दूध डेअरी चौक, केडगाव बायपास आदी ठिकाणी वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची नियुक्ती केली जाते.
मात्र, तिथे निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. आता या नव्या पोर्टेबल चौक्यांमुळे पोलिसांची गैरसोय दूर होणार आहे.
प्रत्येक पोलीस चौकीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्या चौक्या चोवीस तास कार्यरत असतील. त्यामुळे रात्रीच्या वेळीही चौकांमध्ये सतत गस्त राहील आणि सुरक्षा अधिक बळकट होईल.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी काही पोलिस चौक्या उभारण्याचा विचार आहे. विशेषतः गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये या चौक्या उभ्या करण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी काही उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे.
या नव्या पोर्टेबल पोलिस चौक्यांमुळे पोलिसांना अधिक कार्यक्षमपणे गस्त घालता येईल, तसेच नागरिकांच्या सुरक्षेत मोठी वाढ होईल. सतत वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.