श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा बदल घडणार असून, दिवंगत जयंत ससाणे यांचे विश्वासू सहकारी असलेल्या काँग्रेसच्या १० ते १२ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
माजी नगराध्यक्ष आणि ससाणे कुटुंबाचे जवळचे सहकारी संजय फंड यांनी ही माहिती दिली. दुपारी तीन वाजता प्रमुख नेत्यांचा भाजपात प्रवेश होईल, असे त्यांनी सांगितले.

पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित
या प्रवेशानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते भाजपच्या कमळाचा झेंडा हाती घेतील. यावेळी श्रीरामपूर शहरात मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित होणार आहे. सध्या हा प्रवेश सोहळा केवळ शहर आणि नगरपालिका हद्दीपुरता मर्यादित आहे, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा यात समावेश नाही, असे फंड यांनी स्पष्ट केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष आणि १० ते १२ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. सोमवारी फंड यांच्या निवासस्थानी याबाबत सतत बैठका सुरू होत्या.
…म्हणून सत्तेत सहभागी होणे गरजेचे
फंड यांनी सांगितले की, शहरातील रस्ते, पाणी, घरकुल योजना आणि नुकत्याच झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे उद्भवलेले प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे गरजेचे आहे. या कारवाईमुळे अनेकांचे व्यवसाय आणि निवारा उद्ध्वस्त झाला आहे. सत्तेत नसल्यास हे प्रश्न सुटणे कठीण आहे, असे त्यांचे मत आहे.
जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली फंड यांनी काम केले आहे. पक्षांतराबाबत करण ससाणे यांच्याशी चर्चा झाली का, असे विचारले असता, फंड म्हणाले, “शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश करत आहोत. यात करण ससाणे यांच्याशी कोणताही विरोध नाही.”
भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील माजी नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. नुकतीच शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली, परंतु अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.